देवराई गावाजवळ अस्वलाचा हल्ला : शेतकरी जखमी
खानापुर : तालुक्यातील देवराई गावाजवळ सोमवारी 29 जुलै रोजी, सायंकाळी गुरे चारून घरी परतणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. अस्वलाने गावातील शेतकरी नारायण चावरी (65) यांच्यावर पाठीमागून हल्ला करून, त्यांच्या पाठीला व डोक्याला दुखापत केली.
ही घटना नागरगाळी वनपरिक्षेत्रातील देवराई गावाजवळ घडली, नारायणचा आरडाओरडा ऐकून, गावकरी नारायणच्या दिशेने धावून आले. त्यामुळे अस्वलाने नारायणला सोडून जंगलात पळ काढलीं. जखमी नारायणला ग्रामस्थांनी खासगी वाहनातून नंदागड येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार केले. घटनेची माहिती मिळताच एसीएफ सुनीता निंबर्गी आणि आरएफओ नागराज बालेहोसूर यांनी नंदगड रुग्णालयात जाऊन नारायणला पुढील उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.
खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांना याबाबतची माहिती मिळताच, त्यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली असून, जखमींला योग्य ते व अधिक उपचारासाठी बेळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना बेळगाव येथील दवाखान्यात हलविण्यात आली आहे.