Share News

मराठा मंडळाचे मुख्याध्यापक व्ही. एस. हसबे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

मराठा मंडळ संस्थेच्या सेंट्रल हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक म्हणून सेवा बजाविणारे व्ही. एस. हसबे यांचा आज सेवानिवृत्तीनिमित्त शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी आज शिक्षणदानाच्या सेवेतून सेवानिवृत्ती घेतली असून मान्यवर, शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.

मराठा मंडळ शाळेच्या सभागृहात आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष विनायक घसारी तर प्रमुख पाहुणे म्हणून करंबळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बी.बी. पाटील हे उपस्थित होते. ईशस्तवन आणि स्वागतगी झाल्यानंतर पी. बी. मास्तिहोळी यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी शाळेच्या वतीने तसेच माजी विद्यार्थी आणि मान्यवरांच्या वतीने व्ही. ए. हसबे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी पद्मा आणि मातोश्री मंदा यांचा सत्कार करण्यात आला. माजी महापौर मालोजी अष्टेकर, मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, समाजसेवक ऍड. अमर येळ्ळूरकर, अनिल अजगावकर, प्रफुल्ल शिरवलकर, मायाप्पा पाटील माजी विद्यार्थी यासह उपस्थित मान्यवरांनी व्ही. ए. हसबे यांच्या कारकिर्दीबद्दल मनोगत व्यक्त केले. योग शिक्षक डी. टी. सावंत यांनी व्ही. ए. हसबे यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा आढावा घेतला.

आपल्या आजवरच्या कारकिर्दीबद्दल बोलताना व्ही. ए. हसबे म्हणाले, गेली ३४ वर्षे आपण मराठा मंडळ संस्थेत कार्यरत असून २००३ साली करंबळ येथील शाळेतून विद्यादानाचे काम सुरु केले. आजवर अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी देण्याचे कार्य केले असून माझ्या विद्यादानामुळे अनेक विद्यार्थी मला घडविता आले याचे आपल्याला समाधान असल्याचे ते म्हणाले. गणित हा विषय अवघड असल्याचे बोलले जाते. परंतु आपण आजवर गणित सारखा सोपा विषय कुठला नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. आपण शिक्षकी पेशातून जरी निवृत्त झालो असलो तरी शिक्षक म्हणून आजन्म विद्यादानाचे कार्य करतच राहू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी विद्यार्थी सचिन उसूलकर यांनी शाळेसाठी भेटी दाखल दोन संगणक दिले. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या वतीने दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एम. के. पाटील आणि के. एस. मोरे यांनी केले तर आभार के. के. फडके यांनी मानले.


Share News