बेळगावात विवाहित महिलेच्या मृत्यूने खळबळ-पतीच्या घरच्यांच्या छळाचा आरोप
बेळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पतीच्या घरच्यांच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नस्तहीन देसाई, वय २५ वर्षे, असे मृत महिलेचे नाव असून तिच्या मृत्यूप्रकरणी पती आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
मृत महिलेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, गेल्या चार वर्षांपासून तिचा सातत्याने मानसिक छळ करण्यात येत होता. तिला जेवण-पाणी न देता त्रास दिला जात होता. इतकेच नव्हे तर आजारी असतानाही तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही आणि दुर्लक्ष करण्यात आले.
नस्तहीन हिचा विवाह चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील चंदगड येथील रेहान नेसरिकर, वय २७ वर्षे, याच्यासोबत झाला होता. विवाहानंतरपासूनच छळ सुरू असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे.
या घटनेनंतर बेळगाव बीम्स रुग्णालयासमोर आणि जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार वादावादी झाली. परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती.
“आमच्या मुलीवर झालेला अन्याय इतर कोणत्याही मुलीवर होऊ नये,” अशी भावनिक प्रतिक्रिया मृत महिलेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणात नेमके काय घडले, याचा सखोल तपास पोलिस करत आहेत.

