जाधव नगरमध्ये ६५ लाखांच्या अत्याधुनिक उद्यान विकास कामाला प्रारंभ; आमदार असिफ (राजू) सेठ यांचा पुढाकार
बेळगाव : जाधव नगर परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून, आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या विशेष निधीतून तब्बल ६५ लाख रुपयांच्या खर्चातून अत्याधुनिक उद्यान विकास कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत सध्या असलेल्या मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करून नागरिकांसाठी आधुनिक आणि सर्व सुविधांनी युक्त उद्यान उभारण्यात येणार आहे. उद्यानात आकर्षक पाथवे, बसण्याची व्यवस्था, हिरवळ वाढविणे, प्रकाशयोजना तसेच नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी विशेष सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
कामाच्या शुभारंभावेळी आमदार असिफ (राजू) सेठ यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. स्वच्छ, सुंदर आणि सर्वांसाठी खुल्या सार्वजनिक जागा निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकल्पांमुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच नागरिकांना आरोग्यदायी आणि सकारात्मक वातावरण मिळण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या परिसरात चांगल्या सार्वजनिक उद्यानाची अनेक वर्षांपासून गरज होती. अखेर विकासकामाला सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला महापालिका अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

