बेळगावात ऑटो मीटर सक्ती; रॅपिडोसह बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाई
बेळगाव : बेळगाव शहरातील ऑटोरिक्षांमध्ये पुढील १५ दिवसांत भाडेमीटर बसविणे अनिवार्य करण्यात आले असून, नियमाचे पालन न करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याचबरोबर रॅपिडोसह बेकायदा बाईक टॅक्सी सेवा, भाड्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकी आणि परवान्याशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हाईट बोर्ड खासगी कारांवरही कारवाईचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे (आरटीए) अध्यक्ष मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीला आरटीओ, पोलीस विभागाचे अधिकारी तसेच ऑटोरिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन शहरातील सर्व ऑटोरिक्षांमध्ये मीटर सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. यापूर्वीही मीटर बसविण्याचे आदेश देण्यात आले होते; मात्र अनेक ऑटोरिक्षा अजूनही मीटरशिवाय धावत असल्याने यावेळी नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
बैठकीत शहरातील वाढत्या ऑटोरिक्षांच्या संख्येचाही आढावा घेण्यात आला. विद्यमान चालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने नवीन ऑटोरिक्षा परवान्यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत ऑटो संघटना आणि वाहन विक्रेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

