काजू वाहतूक करणारा १४ चाकी आयशर ट्रक पलटी; चालक गंभीर जखमी
यळबेल परिसरात काजू वाहतूक करणारा १४ चाकी मोठा आयशर ट्रक पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
रस्त्याची अवस्था अत्यंत खराब व रस्ता अरुंद असल्याने काजू घेऊन येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्त्यालगत असलेल्या सुमारे १० ते १५ फूट खोल भाताच्या शेतात पलटी झाला.
या अपघातात चालक लक्ष्मण गंगू (रा. पुणे) हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन चालकाला वाहनाबाहेर काढले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेतून त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब व अरुंद असल्याने चारचाकी वाहने चालवितानाही वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या कामासाठी स्थानिक आमदार लक्ष्मीताई हेबाळकर यांनी निधी मंजूर करून आणला असून, लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

