मिरज–कॅसलरॉक पॅसेंजर पुन्हा धावणार; १५ ऑगस्टपासून प्रवाशांना मोठा दिलासा
बेळगाव : मिरज–कॅसलरॉक–मिरज पॅसेंजर रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमार्गावरील दुरुस्तीच्या कामामुळे काही दिवसांपासून लोंढा ते कॅसलरॉक या दरम्यान ही पॅसेंजर सेवा रद्द करण्यात आली होती. मात्र, दुरुस्तीचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने आता ही रेल्वे पुन्हा संपूर्ण मार्गावर धावणार आहे.
नैऋत्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट २०२६ पासून मिरज–कॅसलरॉक–मिरज पॅसेंजर सेवा पूर्ववत सुरू होणार असून रेल्वे कॅसलरॉकपर्यंत नियमित धावेल. यामुळे बेळगाव, खानापूर, लोंढा, कॅसलरॉक तसेच या मार्गावरील इतर स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दुरुस्तीच्या कामामुळे अनेक प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत होता. आता रेल्वे सेवा पूर्ववत सुरू होत असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच दैनंदिन प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
नैऋत्य रेल्वेने प्रवाशांना १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या सेवेबाबत नोंद घेऊन नियोजनपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे वेळापत्रकाची माहिती संबंधित स्थानकांवर किंवा रेल्वेच्या अधिकृत माध्यमांवर उपलब्ध होणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

