बेळगाव बीम्समध्ये सर्व्हर डाऊन; रुग्णांचे हाल, तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ
बेळगाव येथील बीम्स (BIMS) रुग्णालयात सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नव्या E-Hospital NextGen सॉफ्टवेअर अपडेटनंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून सर्व्हरमध्ये सातत्याने अडचणी निर्माण होत असून रुग्णालयातील सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत.
ओपीडीची चिठ्ठी काढण्यासाठी पहाटेपासूनच शेकडो रुग्ण रांगेत उभे राहत आहेत. मात्र सर्व्हर बंद असल्याने नोंदणी प्रक्रिया रखडली असून रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
सिटी स्कॅन, रक्त तपासणी, शुगर टेस्ट, एक्स-रे, इको आदी तपासण्यांसाठी प्रथम बिल भरणे आवश्यक असते. मात्र सर्व्हरच्या समस्येमुळे बिल भरण्यासही चार ते पाच तास विलंब होत असल्याने उपचार सुरू होण्यास उशीर होत आहे.
“रुग्णाला या विलंबादरम्यान काही गंभीर झाले तर जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेषतः विविध तालुक्यांतून उपचारासाठी आलेल्या गरीब रुग्णांना या समस्येचा मोठा फटका बसत असून बीम्स प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्व्हरची समस्या तातडीने दूर करून रुग्णांना सुरळीत सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

