जखमी गरुडाचे रेस्क्यू; वनविभागाकडे सुरक्षित सुपूर्द
बेळगाव, दि. १० एप्रिल २०२६ : येथील कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री. जी. व्ही. चंद्रशेखर यांच्या निवासस्थानावरून आलेल्या तातडीच्या माहितीच्या आधारे एका जखमी गरुडाचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर गरुड झाडावर धडकून जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू पथकातील अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, विकी मेहता, शशिकांत आंबेवाडकर, गौतम श्रॉफ आणि मायकेल पिंटो यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पथकाने जखमी गरुडाला त्वरित प्राथमिक उपचार देत शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. त्यानंतर पक्ष्याला पुढील देखभालीसाठी वनविभाग, बेळगाव यांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले.
या बचाव कार्यासाठी न्यायाधीशांच्या निवासस्थानावरील कर्मचाऱ्यांनी वेळेवर माहिती दिल्याबद्दल त्यांचेही विशेष कौतुक करण्यात येत आहे.

