अल्पवयीन मुलाकडून वडिलांचा खून
झोपेत असताना फावड्याने वार; उद्यमबाग परिसर हादरला
बेळगाव : उद्यमबाग परिसरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून एका अल्पवयीन मुलाने झोपेत असलेल्या आपल्या वडिलांवर फावड्याने वार करून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे.
मृताचे नाव बाळाप्पा नागाप्पा तळवार (वय ४५, रा. उद्यमबाग) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाप्पा हे दारूच्या नशेत पत्नी व मुलांशी वारंवार वाद घालत असत. गुरुवारी रात्रीही घरात वाद झाल्यानंतर मध्यरात्री हॉलमध्ये झोपलेल्या बाळाप्पावर अल्पवयीन मुलाने फावड्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीच्या फिर्यादीवरून उद्यमबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महांतेश होस्पेट व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

