Share News

बेळगावातील क्लब रोडवरील खाजगी हॉटेलला आग लागून पसरले धुराचे लोळ

बेळगाव – शहरातील गजबजलेल्या क्लब रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर उसळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या आतील भागातून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने मोठा आकार घेतला. धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने स्थानिक नागरिक घाबरून बाहेर पडले. काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी हॉटेलमधील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी परिसरात गर्दी नियंत्रणात ठेवत नागरिकांना सुरक्षित अंतरावर राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे क्लब रोड परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आग पूर्णपणे विझल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


Share News