Share News

मराठी रंगभूमीच्या जतनासाठी बेळगावात दुहेरी नाट्यमहोत्सव; “नटसम्राट” आणि “आकाशमिठी” रंगणार!

बेळगावातील मराठी रसिकांसाठी एप्रिल महिन्यात रंगभूमीचा दुहेरी सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला असून, मराठी भाषा व संस्कृती जपण्यासाठी अशा कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. साई पूर्वा आर्ट्स, गोवा प्रस्तुत अजरामर नाट्यकृती नटसम्राट आणि गजांतलक्ष्मी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब निर्मित भव्य ऐतिहासिक नाटक आकाशमिठी यांचे प्रयोग लोकमान्य रंगमंदिर येथे सादर होणार आहेत.

शनिवार, ११ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता “नटसम्राट” या नाटकाचा प्रयोग होणार असून, हे नाटक मराठी रंगभूमीवरील कालातीत कलाकृती मानले जाते. या नाटकाचे लेखन वि. वा. शिरवाडकर यांनी केले असून दिग्दर्शन भालचंद्र उसगांवकर यांचे आहे. कलाकाराच्या जीवनातील चढ-उतार, नातेसंबंध आणि भावविश्व यांचे प्रभावी चित्रण या नाटकातून पाहायला मिळते.

रविवार, १२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता “आकाशमिठी” या ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकाचे लेखन वसंत कानेटकर यांनी केले असून संहिताकार व दिग्दर्शक म्हणून हेमचंद्र नारायण तारी यांनी काम पाहिले आहे. स्वराज्य, शौर्य आणि इतिहासाचा जाज्वल्य वारसा उलगडणारे हे नाटक प्रेक्षकांना एका वेगळ्या अनुभूतीत घेऊन जाणार आहे.

या नाट्यप्रयोगांचे विशेष आकर्षण म्हणजे “नटसम्राट”मधील प्रमुख कलाकार भालचंद्र उसगांवकर यांनी एका दिवसात पाच नाट्यप्रयोग सादर करून गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले आहे.

दोन्ही नाटकांसाठी देणगी प्रवेशिका ₹500 आणि ₹200 अशी ठेवण्यात आली असून, मर्यादित आसनसंख्या लक्षात घेता रसिकांनी लवकरात लवकर आपली जागा निश्चित करावी, असे आयोजकांनी सांगितले आहे.

👉 बेळगावात मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी अशा दर्जेदार कार्यक्रमांना उपस्थित राहणे अत्यंत गरजेचे आहे. अशा उपक्रमांना प्रतिसाद दिल्यासच बेळगावच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाला पुन्हा सोनेरी दिवस येऊ शकतील, असे मत सांस्कृतिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.


Share News