गोकाकजवळ भीषण अपघात; बस आणि दुचाकीच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
गोकाक तालुक्यातील कोन्नूर येथे बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये सैफ मुल्ला (वय 29), सिजा मुल्ला (वय 4) आणि इम्तियाज बडगाव (वय 35) यांचा समावेश आहे. तर जिहान शाहरुख कुडचीकर हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हिडकल येथून गोकाककडे जाणाऱ्या बसची कोन्नूर परिसरात दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात वडील, मुलगी आणि त्यांचा मित्र यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

