Share News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवशंभू ढोल-ताशा ध्वज पथकाचा वाद्यपूजन व सराव शुभारंभ उत्साहात

बेळगाव : आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर श्री शिवशंभू ढोल-ताशा ध्वज पथक, चव्हाट गल्ली, बेळगाव यांच्या वतीने पथकाचा वाद्यपूजन सोहळा व सराव शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि गणेश भक्तीच्या वातावरणात या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व गणेशभक्त उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी माजी आमदार अनिल बेनके, गल्लीचे पंच प्रताप मोहिते, उत्तम नाकाडी, दिगंबर पवार, विश्वजीत हसबे, बाळू नाईक, शंकर कांबळे, सुनील जाधव, गजानन मिसाळे, तसेच बेळगावचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, राघवेंद्र उर्बीन आणि प्रफुल्ल शिरवळकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर पथकातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच धाडस ढोल-ताशा पथक आणि वज्रनाद ढोल-ताशा पथकाच्या अध्यक्षांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री शिवशंभू, धाडस आणि वज्रनाद या तिन्ही ढोल-ताशा पथकांनी सादर केलेले सामूहिक स्नेहवादन होय. ढोल-ताशांच्या दणदणाटाने परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली.

यावेळी मान्यवरांनी युवकांनी भारतीय संस्कृती, परंपरा आणि गणेशोत्सवाची शिस्तबद्ध परंपरा जपत सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन केले. आगामी गणेशोत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण साजरा करण्याचा निर्धार यावेळी पथकाच्या सदस्यांनी व्यक्त केला


Share News