बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या कारचा दिल्लीत भीषण अपघात
बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील प्रवास करत असलेल्या कारचा दिल्लीत रविवारी रात्री भीषण अपघात झाला. दिल्लीतील आय.पी. इस्टेट रोडवर रात्री साडेनऊच्या सुमारास इनोव्हा आणि स्विफ्ट कारची धडक झाली.
या घटनेवेळी इनोव्हा कारमध्ये दिल्लीतील किरारी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल झा आणि कर्नाटकातील बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील हे उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कार लक्ष्मीनगरहून आयटीओच्या दिशेने जात होती. कारमध्ये ३२ वर्षीय अशुतोष पांडे हे पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांसह प्रवास करत होते. पीडब्ल्यूडी कार्यालयाजवळ स्विफ्ट कारने प्रथम दुभाजकाला धडक दिली. त्यानंतर रेलिंग ओलांडून आयटीओहून लक्ष्मीनगरच्या दिशेने येणाऱ्या इनोव्हा कारला धडक झाली.
या अपघातात दोन्ही वाहनांमधील सर्वांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना तातडीने एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

