Share News

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात सीमकार्डसह अँड्रॉईड मोबाईल जप्त

बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांच्या गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर कारागृह प्रशासनाने अचानक तपासणी केली असता शौचालयातील कमोडमध्ये सीमकार्डसह अँड्रॉईड मोबाईल आढळून आला. या प्रकरणी पाच कैद्यांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३१ जुलै रोजी दुपारी कैद्यांच्या दोन गटांत किरकोळ हाणामारी झाली होती. त्यानंतर डेटिन्यू विभागातील बराकींची सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी एका सेलमधील शौचालयाच्या कमोडमध्ये लपवून ठेवलेला मोबाईल आणि सीमकार्ड जप्त करण्यात आले.

या प्रकरणी कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक मल्लिकार्जुन कोण्णूर यांनी नागेंद्र के., जमीर ऊर्फ बच्चा, सय्यद तलानुमान, अब्दुलखादर जिलानी आणि शंकराप्पा कोरवर ऊर्फ बजंत्री या पाच कैद्यांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी कारागृहात भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. कारागृहात बंदी असलेले मोबाईल आणि इतर वस्तू आत कशा पोहोचल्या, याचाही तपास केला जात आहे.


Share News