पोलीस भरती परीक्षेमुळे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी; आरक्षित तिकीटधारकांनाही प्रवेशासाठी झगडावे लागले
बेळगाव : कर्नाटक पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेनिमित्त रविवारी राज्यातील विविध भागांतून हजारो उमेदवारांनी प्रवास केला. याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर दिसून आला. यशवंतपूर जंक्शनसह अनेक प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली.
अनेक रेल्वेंमध्ये आरक्षित तिकीट असूनही प्रवाशांना डब्यात प्रवेश करणे कठीण झाले. जनरलसह काही आरक्षित डब्यांमध्येही प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे स्थानकावर बसण्यासाठीही जागा उपलब्ध नसल्याने परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांना तासन्तास उभे राहावे लागले.
बेळगाव, हुबळी आणि इतर शहरांतील परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने उमेदवार पोहोचल्याने शनिवारी रात्रीपासूनच रेल्वे आणि बसस्थानकांवर गर्दी वाढली होती. अतिरिक्त रेल्वे किंवा विशेष व्यवस्था न केल्यामुळे उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

