Share News

ज्येष्ठ पत्रकार सुनीता देसाई यांना ‘सेवारत्न’ पुरस्कार

नागनूर रुद्राक्षीमठातर्फे गौरव; ८ डिसेंबर रोजी शिवबसव महास्वामीजी यांच्या १३७ व्या जयंती महोत्सवात होणार पुरस्कार प्रदान

बेळगाव : सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल बेळगावच्या ज्येष्ठ पत्रकार सुनीता देसाई यांना नागनूर श्री रुद्राक्षीमठातर्फे ‘सेवारत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

डॉ. शिवबसव महास्वामीजी यांच्या १३७ व्या जयंती महोत्सवानिमित्त ८ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. मठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी यांनी ही माहिती दिली.

६ ते ८ डिसेंबरदरम्यान जयंती महोत्सव

बेळगाव येथे ६, ७ आणि ८ डिसेंबर असे तीन दिवस जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही गौरव करण्यात येणार आहे.

शिवबसव महास्वामीजी हे कर्नाटक एकीकरण चळवळ आणि स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी व्यक्तिमत्त्व होते. सीमाभागात ते ‘नागनूर स्वामीजी’ म्हणून प्रसिद्ध होते. १९३२ मध्येच त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रसाद निलय सुरू करून जात, धर्म आणि पंथाचा भेदभाव न करता विद्यार्थ्यांना अन्न व निवारा उपलब्ध करून दिला होता.

सुमारे सात दशके सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.


Share News