बेळगावात रील्सच्या नादात वाढदिवस साजरा; तलवारीने केक कापला
बेळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या नादात धोकादायक प्रकार करणाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कडक इशारा दिला आहे.
शौक आणि मौजमजेसाठी सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
कित्तूर तालुक्यातील एम.के. हुबळी गावाबाहेरील परिसरात वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापल्याचा प्रकार समोर आला. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार घडला.
जैद नूरअहमद सनदी आणि तबरेज हनीफ खाद्री या युवकांनी बाइकवर केक ठेवून तलवारीने वाढदिवस साजरा केला. त्यानंतर त्याचा व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला.
इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून दखल घेत गुन्हा दाखल केला आणि संबंधित आरोपींना अटक केली.
आरोपींकडून केक कापण्यासाठी वापरलेली तलवार आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही घटना कित्तूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी जीवितास आणि कायद्याला धोका निर्माण करणारे कृत्य करू नये, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.

