बेळगावात ऑलिव्ह ग्रीन्स गोल्फ लीग सिझन १ ला उत्साहात सुरुवात
ऑलिव्ह ग्रीन्स गोल्फ लीग (OGGL) सिझन १ चा उद्घाटन सोहळा आज बेळगाव येथील ऑलिव्ह ग्रीन्स गोल्फ कोर्सवर उत्साहात पार पडला. यामुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
या लीगमध्ये आठ संघांचा सहभाग असून, त्यांचे नेतृत्व शहरातील नामांकित व्यक्तींनी केले आहे. यात मिहीर पोटदार इलेव्हन (मिहीर पोटदार), डायनॅमिक सिल्व्हरबिल खोत (श्रीशैल खोत), रॉयल किंग्ज (राजेश कांबळे), क्लाऊड ९ टायगर्स (डॉ. अरुण किल्लेकर), एसबीजी वॉरियर्स (राज घाटगे), युनिव्हर्सल ईगल्स (आदर्श गुलबानी व सुमुख छाब्रिया), आदित्य एलिट चॅम्पियन्स (सचिन उसळकर) आणि द मास्टर्स (कर्नल मोहन नाईक व अभय कुलकर्णी) या संघांचा समावेश आहे.
स्पर्धेची सुरुवात पारंपरिक ‘गनशॉट’द्वारे करण्यात आली. त्यानंतर पहिला फेरी ‘फोरबॉल’ या प्रकारात खेळवण्यात आला. स्पर्धेपूर्वी ऑलिव्ह ग्रीन्स गोल्फ कोर्सचे अध्यक्ष यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत, बेळगावात गोल्फ क्रीडेची वाढ होत असल्याचे सांगितले तसेच भविष्यात गोवा आणि कोल्हापूर येथील संघांनाही सहभागी करून घेण्याचा मानस व्यक्त केला.
या लीगमध्ये बेळगाव व परिसरातील एकूण ९० गोल्फपटू सहभागी झाले आहेत. पहिल्या फेरीनंतर क्लाऊड ९ टायगर्स संघाने ३३.५ गुणांसह आघाडी घेतली आहे. तर द मास्टर्स आणि रॉयल किंग्ज हे प्रत्येकी ३० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. डायनॅमिक सिल्व्हरबिल स्टारने २०, युनिव्हर्सल ईगल्सने १९, मिहीर पोटदार इलेव्हनने १०, एसबीजी वॉरियर्सने ८ आणि आदित्य एलिट चॅम्पियन्सने ५ गुण मिळवले आहेत.
ही लीग एकूण तीन फेऱ्यांमध्ये विविध प्रकारात खेळवली जाणार असून, अंतिम सामना ५ एप्रिल रोजी होणार आहे. या स्पर्धेला ऑलिव्ह ग्रीन्स गोल्फ कोर्सचे सदस्य तसेच BMW आणि Toyota यांसारख्या प्रायोजकांचे सहकार्य लाभले आहे.

