Share News

बेळगावात ‘शार्ड सेंटर फॉर इनोव्हेशन’चे उद्घाटन; विद्यार्थ्यांना एआय व रोबोटिक्स शिक्षणाची संधी

बेळगाव : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या युगात विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्ससारख्या नव्या क्षेत्रांचे शिक्षण मिळावे या उद्देशाने बेळगाव येथे ‘शार्ड सेंटर फॉर इनोव्हेशन’ या नव्या केंद्राचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या केंद्राचे फ्रेंचायझी मालक अजीज बरफवाला असून युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन समारंभादरम्यान रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोट्सची कार्यपद्धती आणि त्यामागील तांत्रिक प्रक्रिया पाहून उपस्थितांनी विशेष उत्सुकता व्यक्त केली.

या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, ड्रोन प्रोग्रामिंग, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), डिझाईन थिंकिंग तसेच 3D प्रिंटिंग यांसारख्या अत्याधुनिक विषयांचे प्रशिक्षण प्रत्यक्ष प्रयोग आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दिले जाणार आहे.

यावेळी बोलताना फ्रेंचायझी मालक अजीज बरफवाला यांनी बेळगावातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे दर्जेदार शिक्षण सहज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच शहरातील विविध शाळांमध्येही हे प्रशिक्षण मोफत स्वरूपात देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात मृणाल हेब्बाळकर यांनी विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत असे शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.

या केंद्राच्या स्थापनेमुळे बेळगावातील विद्यार्थ्यांना लहान वयातच विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष शिक्षण घेण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे.


Share News