होनगा येथे ‘श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा’
बेळगाव तालुक्यातील होनगा व बेन्नाळी गावांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, होनगा येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा सोमवार दि. १६ मार्च २०२६ ते रविवार दि. २२ मार्च २०२६ या कालावधीत भक्तिभावाने पार पडणार आहे.
या सोहळ्याची मुहूर्तमेढ सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता सर्व वारकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रोवण्यात आली.
या धार्मिक कार्यक्रमाला माननीय खासदार कु. प्रियांकाताई जारकीहोळी (चिकोडी विभाग), माननीय आमदार व कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. सतीश अण्णा जारकीहोळी, तसेच ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. जिजाबाई जयवंत धुडूम यांची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय श्री ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामभाऊ चन्नाप्पा आनंदाचे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दैनंदिन कार्यक्रम
दररोज पहाटे ४.३० ते ६.०० काकड आरती व अभिषेक, सकाळी ७.३० ते ९.३० ज्ञानेश्वरी वाचन, त्यानंतर अल्प विश्रांती. सकाळी १०.०० ते ११.३० पुन्हा ज्ञानेश्वरी वाचन होणार आहे. दुपारी ३.०० ते ५.०० गाथा भजन, सायंकाळी ६.०० ते ७.०० प्रवचन, ७.०० ते ७.३० ‘जय जय राम कृष्ण हरी’ या बीजमंत्राचा सामुदायिक जप, तर रात्री ९.०० ते ११.०० कीर्तन (निरुपण) आणि त्यानंतर जागर भजन असा कार्यक्रम असणार आहे.
प्रवचनकार
सोहळ्यात ह.भ.प. मारुती पाटील (मंडोळी), ह.भ.प. शशिकांत गावडे (खानापूर), ह.भ.प. कृष्णमुर्ती बोंगाळे (हलकर्णी), ह.भ.प. सुभाष जोशी (बेळगाव), ह.भ.प. बाळू भक्तीकर (तुरमुरी) आणि ह.भ.प. श्रीकांत मारुती आनंदाचे (होनगा) यांची प्रवचने होणार आहेत.
समारोप कार्यक्रम
रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ ते ८ ज्ञानेश्वरी वाचन, ग्रंथपूजन, आरती व पसायदान होईल. त्यानंतर मंदिराभोवती १२ ते १ दिंडी सोहळा काढण्यात येणार आहे.
तसेच सकाळी ९ ते ११ काला कीर्तन, ११ ते १२ काल्याचे अभंग व काला वाटप होणार आहे. या दिवशी ह.भ.प. गोपाळ महादेव पाटील (कंग्राळी बु.), सद्गुरु विठ्ठल (दादा) बासकर महाराज, पंढरपूर, चैतन्य (भाऊ) एकनाथ वासकर महाराज, निवृत्ती माधवराव कोंपले (उदगीर), सुधाकर शिळे (चंदूर), गोपाळअण्णा तुकाराम वासकर महाराज, गजानन गणबावले (पेठ वडगाव) आणि एकनाथ (आप्पा) वासकर महाराज, पंढरपूर यांची कीर्तने होणार आहेत.
या सोहळ्याचे आयोजन होनगा ग्रामपंचायत सदस्य, दूध उत्पादक संघ कमिटी, श्री काळभैरवनाथ देवस्थान कमिटी, गावातील सर्व युवक मंडळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शिवछत्रपती स्मारक सेवा संघ, छत्रपती शिवशंभू स्मारक सेवा संघ तसेच समस्त वारकरी व ग्रामस्थ होनगा-बेन्नाळी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

