वडगाव रयत गल्लीतील पाणी समस्येवरून रहिवाशांचे आंदोलन
बेळगाव : वडगाव येथील रयत गल्ली परिसरात मागील काही महिन्यांपासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त रहिवाशांनी महानगरपालिकेसमोर आंदोलन केले. परिसरात 10 ते 20 दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, येणारे पाणीही अनेकदा दूषित असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
पाणीटंचाईमुळे जनावरांनाही पिण्याच्या पाण्याचा अभाव भासत असून त्यांचे
हाल होत आहेत. अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रहिवाशांनी महानगरपालिकेसमोर आंदोलन करत तातडीने नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. प्रशासनाने लवकरात लवकर या प्रश्नावर ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला

