काकती येथे टू-व्हीलर गॅरेजला भीषण आग; ७ लाखांचे नुकसान
काकती गावाजवळ हायवेच्या बाजूला असलेल्या एका टू-व्हीलर गॅरेजला अचानक आग लागून अंदाजे सहा ते सात लाखांचे मोठे नुकसान झाले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
गॅरेजला आग लागल्याची माहिती समाजसेवक गजानन गव्हाणे यांनी तातडीने अग्निशामक दलाला दिली. अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. वेळेत आग विझवण्यात यश आले असले तरी गॅरेजमधील साहित्य, उपकरणे व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले.
हे गॅरेज गरीब कुटुंबातील युवक विक्रम आनंदाचे यांनी स्वकष्टाने कर्ज काढून सुरू केले होते. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह या गॅरेजवर अवलंबून होता. आगीत सर्व काही जळून खाक झाल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. प्रशासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दरम्यान, यावर्षी काकती गावातील ही तिसरी आग लागण्याची घटना असून गावात फाईव्ह स्टार हॉटेल्स व इंडस्ट्रियल एरिया वाढत असल्याने लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे काकती येथे स्वतंत्र अग्निशामक केंद्र स्थापन करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची नोंद काकती पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

