Share News

बेळगाव महानगरपालिका कर्मचारी कल्याण विकास संघटनेची सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी कर्मचारी कल्याण विकास संघटनेची सर्वसाधारण सभा तातडीने बोलावण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून संघटनेने कोणतीही सर्वसाधारण सभा आयोजित केलेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा संघटनेकडे विविध समस्या आणि मागण्यांबाबत अर्ज करण्यात आले; मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला असल्याची तक्रार करण्यात येत आहे.

मागील आयुक्तांविरुद्ध कट रचला गेला असताना देखील संघटनेने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही किंवा नैतिक पाठिंबा दिला नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. तसेच दरवर्षी सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासही संघटना अपयशी ठरल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, बेळगाव महानगरपालिकेच्या कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ३ कोटी ४० लाख रुपये कायद्याने वसूल करून २०१७-या वर्षात रायण्णा सहकारी संस्थेत जमा करण्यात आले होते. मात्र त्या वर्षी संबंधित संस्था पूर्णपणे तोट्यात गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संस्थेच्या संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे व्यवहार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या इतक्या मोठ्या रकमेचा गैरवापर झाल्याचा आरोप असूनही संघटनेने संबंधित संचालक मंडळाविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नसल्याचेही सांगण्यात आले. याशिवाय कर्मचाऱ्यांपुढे इतर अनेक समस्या व अडचणी निर्माण झाल्या असून त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर संघटनेला बळकटी देण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तातडीने सर्वसाधारण सभा बोलवून या प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


Share News