आईच्या निधनानंतर नैराश्यातून टोकाचे पाऊल-विहिरीत घेतली उडी
बेळगाव तालुक्यातील अंबेवाडी गावात आईच्या निधनाच्या दुःखातून नैराश्यात गेलेल्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने, ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचविण्यात यश आले.
बाबू पांडू सांबरेकर (वय ४१) असे त्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आईच्या निधनानंतर ते मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीत उडी घेतल्यानंतर सांबरेकर हे आत असलेल्या केबलमध्ये अडकले. काही वेळाने ते पाण्यात बेशुद्ध अवस्थेत दिसून आले. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोरखंडाच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढले.
त्यानंतर त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांनी मानसिक तणावात असलेल्या व्यक्तींना आधार देण्याची गरज व्यक्त केली आहे.

