Share News

मर्कंटाइल सोसायटी तर्फे महिलांचा सन्मान

बेळगाव-“आयुष्यात यश मिळवायचे असेल तर आपली शारीरिक, मानसिक आणि आर्थिक क्षमता प्रबळ असली पाहिजे त्यासाठी जीवनशैली बदला तणाव कमी करा पुरेशी झोप घ्या” असा सल्ला डॉक्टर नीता देशपांडे यांनी बोलताना महिला वर्गाला दिला.
येथील मर्कंटाइल को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा समारंभपूर्वक सत्कार सोमवारी सायंकाळी मराठा मंदिर येथे करण्यात आला . त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मधुमेह तज्ञ व ओबीसीटी फिजिशियन डॉ. नीता देशपांडे उपस्थित होत्या.
“बेळगाव शहरातील दिग्गज महिलांचे यश पाहून मी मंत्रमुग्ध झाले या स्त्रियांनी आकाशापर्यंत झेप घेतली आहे ही सर्वांना प्रेरणादायी आहे” असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मर्कंटाइल सोसायटीचे चेअरमन संजय मोरे हे होते.
या कार्यक्रमात मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्ष डॉ. राजश्री हलगेकर -नागराजु, स्तनाच्या कर्करोगाशी झुंजून यशस्वी झालेल्या आणि इतरांना मार्गदर्शन करणाऱ्या मयुरा शिवलकर, पुढारी च्या पत्रकार अक्षता नाईक, हेस्ट या आंतरराष्ट्रीय परीक्षेत कर्नाटकात प्रथम,देशात पाचवा आणि जागतिक स्तरावर 21वा क्रमांक मिळवणाऱ्या मच्छे येथील तृप्ती मल्लाप्पा देसाई आणि सुवर्ण पदक मिळवणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरा स्विमर सिमरन गोंडाडकर या पाच महिलांचा सन्मान करण्यात आला. डॉ. नीता देशपांडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, रोपटे भेटवस्तू आणि स्मृती चिन्ह देऊन या महिलांना गौरविण्यात आले.
आसावरी भोकरे यांनी प्रास्ताविक करून सर्व सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आल्यानंतर चेअरमन श्री संजय मोरे यांनी सर्वांचे स्वागत केले.
याप्रसंगी सत्कारास उत्तर देताना डॉ. राजश्री नागराजू हलगेकर म्हणाल्या की,”जर आपल्याकडे सकारात्मकता असेल, तर जगातील कोणतीही शक्ती स्त्रीला हरवू शकत नाही. स्त्री ही शक्तीचे रूप आहे, तिने स्वतःला कधीही कमी लेखू नये.”
मोबाईलच्या वाढत्या वापराबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. आज परिस्थिती गंभीर असून मोबाईलमुळे घरातील संवाद हरवत चालला आहे.”असे त्या म्हणाल्या.
मयुरा शिवलकर म्हणाल्या की
” अपयश, संघर्ष आणि रिजेक्शन हे आयुष्याचा भाग आहेत, पण त्यांनाच प्रगतीची शिडी बनवून आयुष्यात यशस्वी होता येते, ​धावण्याने आपल्याला शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही खंबीर बनवले . ​महिलांनी आपल्या जबाबदाऱ्या आणि कुटुंबाला नेहमी प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. याप्रसंगी सोसायटीचे संचालक प्रसन्ना रेवन्नावर, अतुल कपिलेश्वरी, राजेंद्र आडुरकर, शारदा सावंत व जयपाल ठकाई हे उपस्थित होते. या कार्यक्रमास शहरातील महिला तसेच सोसायटीचे कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share News