Share News

पोलिस आयुक्तांनी शेतीतील गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई करावी – शेतकऱ्यांची मागणी

शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू, अफू, गांजा यांसारख्या गैरप्रकारांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे वृत्त वाचून समाधान व्यक्त होत असले तरी ग्रामीण भागातील शेतांमध्ये वाढलेल्या गैरप्रकारांमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. रब्बी हंगामातील पिके, वाळलेल्या चाऱ्याचे गंजी, बांधावरील झाडे यांच्या परिसरात काही जण दारू, बिअर, गांजा सेवन करून जुगार खेळत बसतात. हॉटेलमधून खाद्यपदार्थ आणून शेतात पार्ट्या केल्या जातात. त्यामुळे शेतात कामासाठी गेलेल्या महिलांना भीतीचे वातावरण निर्माण होत असून त्यांना काम सोडून परत जावे लागते.

अनेकदा अशा ठिकाणी भांडणे होऊन बिअरच्या बाटल्या फोडल्या जातात. काचा व कचरा शेतातच टाकून दिला जातो. तो साफ करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. रब्बी पिकांची, बांधावरील तुरीची चोरी, गवताच्या गंजींना आग लावणे तसेच बोअरवेलच्या मोटारींच्या वायर व साहित्य चोरीस जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शहापूर, येळ्ळूर, वडगाव, अनगोळ व शिलार परिसरात अशा चोरीच्या घटना घडल्याची तक्रार वडगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू असल्याचे सांगितले असले तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.

येळ्ळूर रस्त्यालगतच्या शेतांमध्ये काही बेकायदेशीर धाबे व बारमधून येणारे लोकही शेतात गैरप्रकार करतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी संबंधित पोलिस ठाण्यांना कठोर आदेश देऊन शेतीतील दारू, गांजा व इतर बेकायदेशीर कृत्यांवर तात्काळ कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे, चाऱ्याचे व शेतीतील साहित्याचे संरक्षण करावे, अशी कळकळीची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.


Share News