पुढील यात्रेपूर्वी माझी सासू मरू दे” –
हुंडी मोजताना शंभर व दहा रुपयांच्या नोटांमध्ये सापडली चिठ्ठी
देवाकडे कोणी संस्कार मागतो, कोणी संपत्ती… कोणी आरोग्य, तर कोणी समाधान आणि आनंद. पण देवाकडे जर कोणी थेट सासूच्या मृत्यूचीच मागणी केली, तर तो विषय चर्चेचा ठरणारच!
होय… बेळगाव जिल्ह्यातील एका गावातील मंदिराच्या हुंडीत अशीच एक धक्कादायक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीत कन्नड भाषेत लिहिले आहे –
“देवा… पुढील यात्रेपूर्वी माझी सासू मरू दे… माझे कष्ट दूर कर!”
खणदाळ (ता. रायबाग, जि. बेळगाव) येथील हुली कांतेश्वर मंदिरात ही घटना उघडकीस आली. यात्रेनंतर मंदिराची हुंडी उघडून रक्कम मोजण्याचे काम सुरू होते. शंभर आणि दहा रुपयांच्या नोटा एकत्र गुंडाळलेल्या दिसल्या. त्या नोटा उघडताच आत एक चिठ्ठी आढळली… आणि त्यातील मजकूर वाचून कमिटी सदस्यही क्षणभर थबकले.
भक्त देवाकडे साधारणपणे सुख-समाधान, भरभराट, आरोग्य यांची प्रार्थना करतात.
“देवा माझा एक पुरवावा लाड, आनंदाचे झाड माझ्या दारी,” अशी अपेक्षा असते.
पण येथे मात्र कोणीतरी आपल्या वैयक्तिक वैरातून थेट सासूच्या मृत्यूचीच मागणी केली आहे!
ही चिठ्ठी वाचल्यानंतर यात्रेच्या कमिटी सदस्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि नकळत हसू उमटले. त्यातील एका सदस्याने हा फोटो सोशल मीडियावर टाकताच तो तुफान व्हायरल झाला आहे.
सध्या या अनोख्या आणि वादग्रस्त मागणीची चर्चा परिसरात रंगली असून, देवाकडे अशी प्रार्थना करणारा ‘तो’ भक्त कोण? याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.

