दरोडेखोर टोळीवर खानापूर पोलिसांचा छापा; पिस्तूल, दागिने जप्त
खानापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या घरफोडी, चोरी आणि दरोड्याच्या घटनांचा अखेर पोलिसांनी छडा लावला असून दहा खतरनाक आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दरोड्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल, सोन्याचे दागिने आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रबियुल रोहूल अमीन गाजी (२९), अलीहुसेन कबीरुद्दीन मंडल (२७), सादिक अब्दुल रहमान तोरगल (३७), विवेक चंद्रकांत पाटील (३३), प्रशांत महादेव चव्हाण (३७), नितिन राजाराम चव्हाण (३६), दिगंबर नागेश पाटील (२६) आणि मयूर राजू घाडी (२६) यांचा समावेश आहे. याशिवाय आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे या टोळीचा माग काढण्यासाठी खानापूर पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली होती. ही पथके बेळगाव, महाराष्ट्र आणि गोवा येथे गुप्त तपास करत होती. तपासादरम्यान मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीच्या आधारे संशयितांना पकडण्यात यश आले.
चौकशीदरम्यान आरोपींनी अनेक घरफोड्या आणि दरोड्यांच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीमुळे खानापूर शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सोमवारी रात्री सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. डीवायएसपी वीरय्या हिरेमठ आणि पोलीस निरीक्षक लालसाब गवंडी यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू असून आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

