Share News

रंगपंचमीचा आनंद शोकांतिका ठरला…

रंगपंचमीचा उत्साह, आनंद आणि रंगांनी भरलेला दिवस एका कुटुंबासाठी मात्र कायमचा दु:खाचा ठरला. अंघोळीसाठी मलप्रभा नदीघाटावर गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शहरातील महादेव मंदिराजवळील नदीपात्रात घडली.

विशाल सातेरी बिर्जे (वय २५, रा. मारुती गल्ली, गर्लगुंजी, ता. खानापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशालने गावातील मित्रांसोबत रंगपंचमीचा आनंद साजरा केला होता. रंगांच्या उत्सवात रमलेला विशाल दुपारी अंघोळ करण्यासाठी खानापूर शहराजवळील मलप्रभा नदीघाटावर गेला. मात्र अंघोळ करत असताना तो अचानक खोल पाण्यात बुडाला.

ही बाब लक्षात येताच सोबत असलेल्या तरुणांनी तातडीने ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रसाद पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मलप्रभा नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली.

काही वेळाच्या शोधानंतर बुडालेल्या ठिकाणीच विशालचा मृतदेह आढळून आला. रंगपंचमीसारख्या आनंदाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गर्लगुंजी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एका क्षणात रंगांचा उत्सव दु:खाच्या सावटात बदलला.


Share News