खानापूर तालुक्यातील डोंबारा समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमण; दलित संघर्ष समितीचा निषेध
बेळगाव, प्रतिनिधी :
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सर्व्हे क्रमांक ९३/ए१ मधील डोंबारा समाजाच्या पारंपरिक दफनभूमीवर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप दलित संघर्ष समितीने केला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अतिक्रमण तात्काळ हटवून समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दलित संघर्ष समितीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खानापूर शहरातील शाहुनगर परिसरात डोंबारा समाज गेल्या सुमारे ३०० वर्षांपासून आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार करत आहे. सर्व्हे क्रमांक ९३/ए१ मधील ही जागा समाजासाठी पारंपरिक, ऐतिहासिक आणि भावनिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे.
मात्र, सुमारे ३० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सिरेमिक उत्पादन कंपनीच्या नावाचा गैरवापर करून काही कामगार व स्थानिक प्रभावशाली व्यक्तींनी या जागेतील झाडे तोडून कबरींवर दगड टाकत जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कृतीमुळे समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समाजाच्या वतीने तहसीलदार कार्यालय तसेच स्थानिक नगरपंचायतीकडे अनेकदा लेखी तक्रारी देण्यात आल्या. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप समितीने केला आहे. अतिक्रमण करणारे न्यायालयीन प्रक्रियेपासून दूर राहून पोलिस संरक्षणात जमीन बळकावत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
“जिवंत असताना भटक्या म्हणून जीवन जगणाऱ्या समाजाला मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नाकारली जात आहे. हे त्यांच्या घटनात्मक आणि मानवी हक्कांचे स्पष्ट उल्लंघन आहे,” असा ठाम आरोप दलित संघर्ष समितीने केला आहे.
सदर अतिक्रमण तात्काळ हटवून दफनभूमी संरक्षित घोषित करावी, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि समाजाच्या पारंपरिक हक्कांचे रक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

