जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार आसिफ राजू सेठ यांचा दौरा
जनतेच्या समस्या थेट ऐकून घेण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून आमदार आसिफ राजू सेठ यांनी बेळगाव शहरातील वेलकम हॉलजवळील फॉर्च्युन कॉलनी परिसराला भेट देत स्थानिक नागरिकांशी ‘जनता दरबार’च्या माध्यमातून संवाद साधला.
या भेटीदरम्यान आमदार सेठ यांनी परिसराचा पाहणी दौरा करून नागरी सुविधांची स्थिती जाणून घेतली. यावेळी नागरिकांनी रस्ते, गटार व्यवस्था, स्वच्छता तसेच इतर स्थानिक विकासकामांबाबत आपल्या समस्या आणि मागण्या मांडल्या.
नागरिकांच्या समस्या ऐकून घेत आमदार आसिफ राजू सेठ यांनी संबंधित विभागांशी चर्चा करून त्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी आवश्यक पाउले उचलली जातील, असे आश्वासन दिले. जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधल्यामुळे प्रत्यक्ष समस्यांची माहिती मिळते आणि त्यावर वेळेत उपाययोजना करणे शक्य होते, असे त्यांनी सांगितले.
या दौऱ्यावेळी स्थानिक नागरिक तसेच परिसरातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदारांनी स्वतः परिसरात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्याबद्दल स्थानिकांनी त्यांच्या उपक्रमाचे स्वागत केले.

