Share News

बेळगावात १२ वर्षीय बाललेखिकेची झळाळती कामगिरी; लावण्या कम्मरची पहिली पुस्तक जाहीर

बेळगाव, कर्नाटक – शहरातील बिर्ला इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणारी १२ वर्षीय लावण्या पृथ्वीराज कम्मर हिने आपल्या पहिल्या तुकांत पुस्तकाची घोषणा करत साहित्य क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. “द शॅडो ऑफ इनोसेंस अँड इमॅजिनेशन्स – राइम्स फ्रॉम बेलगावी टू भारत” या पुस्तकाच्या प्री-लॉन्च प्रेस मीटचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

भारतातील बालशिक्षणात वापरल्या जाणाऱ्या बहुतांश तुकांत कविता पाश्चात्य संस्कृतीवर आधारित असल्याने भारतीय मूल्यांवर आधारित तुकांतांची गरज लक्षात घेऊन हे पुस्तक साकारण्यात आले आहे. या पुस्तकात शहीद भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांसारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांवर आधारित तुकांतांचा समावेश आहे. तसेच भगवान कृष्ण, राम आणि शिव यांच्या प्रेरणादायी कथांनाही स्थान देण्यात आले आहे.

पुस्तकात पालक, शिक्षक आणि ज्येष्ठांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असून “माता, पिता, गुरु, दैवम्” या भारतीय मूल्यांची जपणूक करण्यात आली आहे. बेलगाव शहराची संस्कृती, परंपरा आणि येथील शहीदांवरही काही विशेष तुकांत समाविष्ट करण्यात आले आहेत.

प्रेस मीटमध्ये बोलताना लावण्या हिने आपल्या कुटुंब, शाळा, शहर आणि देशातून प्रेरणा घेतल्याचे सांगितले. “मी लहान असले तरी छोटे विचारही मोठा बदल घडवू शकतात,” असे ती नम्रपणे म्हणाली.

ही पुस्तक केवळ तुकांतांचा संग्रह नसून भारताच्या समृद्ध वारशाचा गौरव करणारे आणि मुलांमध्ये सकारात्मक मूल्ये रुजवणारे एक प्रेरणादायी साहित्यकृती ठरत आहे. या पुस्तकाच्या अधिकृत प्रकाशन सोहळ्याबाबत आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.


Share News