बेळगावात 100 कोटींचे उभारणार भव्य वेंकटेश्वर मंदिर
बेळगाव :
येथील सदाशिवनगरमधील रेड्डी भवन येथे मंगळवारी बेळगाव रेड्डी संघाच्या वतीने शहराच्या बाहेरील परिसरात सुमारे सात एकर जागेत भव्य श्री वेंकटेश्वर मंदिर उभारण्यासाठी आंध्रप्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) प्रशासनाला भूमी हस्तांतरण कार्यक्रम पार पडला.
यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंदिर बांधकामाबाबत तसेच टीटीडी प्रशासनाला जमीन हस्तांतरित करण्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती देण्यात आली. टीटीडी प्रशासन मंडळाचे सदस्य एस. नरेश कुमार यांनी सांगितले की, मंदिर उभारणीसाठी बेळगाव रेड्डी संघाने सद्भावनेतून सुमारे 7 एकर जमीन देणे ही कौतुकास्पद बाब आहे. पुढील दोन वर्षांत सुमारे 100 कोटी रुपये खर्चून मंदिर उभारण्यात येणार असून त्यापैकी 80 टक्के निधी टीटीडीकडून, 10 टक्के रेड्डी संघाकडून आणि उर्वरित 10 टक्के देणगीदारांकडून उभारला जाणार आहे.
कर्नाटकातील दात्यांच्या सहकार्याने मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून, तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या बेळगावच्या बाहेरील भागात हे मंदिर उभारल्यास भाविकांना मोठी सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांनाही याचा लाभ होणार आहे. तिरुपतीप्रमाणेच येथेही धार्मिक कार्यक्रम, भाविकांसाठी निवास व्यवस्था, प्रसाद (लाडू) यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
याशिवाय, देशभरात मंदिर बांधकाम व जीर्णोद्धारासाठी टीटीडीकडून सुमारे 9,000 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
कर्नाटक राज्य रेड्डी जनसंघाचे अध्यक्ष लक्ष्मण रेड्डी यांनी बेळगावात टीटीडीमार्फत मंदिर उभारणी होत असल्याचा अभिमान व्यक्त केला. यासाठी बेळगाव रेड्डी संघाचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बेळगाव रेड्डी संघाचे अध्यक्ष रामण्णा मुळ्लूर, उपाध्यक्ष कांतू जालिबेरी, विक्रम जैन, अविनाश पोतदार, सुरेश देसाई, मंजनाथ केसूर, प्रकाश ककरड्डी, डॉ. गिरीश सोनवलकर आदी उपस्थित होते.

