Share News

लोकमान्य टिळकांना टिळक चौकात विनम्र अभिवादन

भारतीय जनता पक्षाचे नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज (१ ऑगस्ट) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक चौक येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी किरण जाधव यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा लोकमान्य टिळकांचा प्रेरणादायी संदेश आजही प्रत्येक भारतीयाला राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि देशसेवेची प्रेरणा देत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजात राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली तसेच केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांतून ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवून स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

या अभिवादन कार्यक्रमास भाजपा नेते किरण जाधव, राजन जाधव तसेच टिळक चौक रिक्षा अध्यक्ष आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण देशभक्तीपर घोषणांनी आणि लोकमान्य टिळकांच्या स्मृतींना अभिवादनाने भारावून गेले.


Share News