बडस येथे चार लाखांच्या शर्यतीच्या बैलाचा विहिरीत पडून मृत्यू; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
बडस गावात एक दुर्दैवी घटना घडली असून, येथील युवा शेतकरी कल्लाप्पा भीमाना पाटील यांच्या सुमारे चार लाख रुपये किमतीच्या शर्यतीच्या बैलाचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्लाप्पा पाटील यांचा शर्यतीचा बैल अचानक घरातून दोर तोडून बाहेर पडला आणि सैरावैरा पळू लागला. बैलाला पकडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र तो कोणाच्याही ताब्यात आला नाही. अखेर मोरब रस्त्यावर कल्लाप्पा पाटील यांनी बैलाला पकडून झाडाला बांधले. मात्र, बैलाने पुन्हा दोर तोडून धूम ठोकली आणि थेट जवळील विहिरीत उडी घेतली.
आपल्या लाडक्या बैलाला वाचवण्यासाठी कल्लाप्पा पाटील यांनीही क्षणाचाही विलंब न लावता विहिरीत उडी घेतली. मात्र, बैलाला वाचवण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. दैव बलवत्तर असल्याने कल्लाप्पा पाटील हे सुखरूप बाहेर आले; परंतु बैलाची मान मोडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गावातील शेकडो युवक घटनास्थळी धावून आले. बैलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र ते अयशस्वी ठरले. अखेर जेसीबीच्या साहाय्याने बैलाला विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
या अपघातामुळे शेतकरी कल्लाप्पा पाटील यांचे सुमारे चार लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

