महापौर, आयुक्तांकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीच्या कामांचा आढावा
बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्ग आणि विविध नागरी सुविधांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बेळगावच्या महापौर प्रिती कामकर आणि महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी गुरुवारी शहरातील प्रमुख भागांची पाहणी केली.
महापौर प्रिती कामकर, महापालिका आयुक्त तसेच कर्मचारी यांनी कपिलेश्वर तलाव परिसरात पूजा केली. त्यानंतर राणी चन्नम्मा चौक, समादेवी गल्ली, मारुती गल्ली, गणपती गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, संभाजी चौक, टिळक चौक, हेमू कलानी चौक, मार्केट परिसरासह गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांची पाहणी करण्यात आली.
यावेळी महापौर प्रिती कामकर यांनी रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, स्वच्छता व्यवस्था आणि वीज वाहिन्यांसह इतर आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी एल अँड टी, हेस्कॉमसह संबंधित सर्व विभागांना २४ तास काम करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानुसार कामे वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पूर्वतयारी बैठकीत ठरविण्यात आलेल्या उपाययोजनांनुसार महापालिका आणि विविध विभागांना सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
या पाहणीवेळी सत्ताधारी पक्षाचे नेते संतोष पेडणेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रेयस नाकाडी, राजू भातकांडे, नितीन जाधव, गिरीश धोंगडी, आनंद चौहान, रेश्मा कामकर, वैशाली भातकांडे यांच्यासह अन्य नगरसेवक, विकास विभागाच्या उपआयुक्त लक्ष्मी सुळगेकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

