गणेशोत्सवात बेळगावातील दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत होणारी ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेता, बेळगाव शहरातील दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केळकर बाग परिसरातील व्यापारी संघटनेतर्फे आज पोलीस आयुक्त कार्यालयात उपपोलीस आयुक्त नारायण भारमनी यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात ग्रामीण तसेच शहर परिसरातील नागरिक रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. मात्र, काही ठिकाणी दुकाने लवकर बंद करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याने व्यापारी आणि ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही बाब लक्षात घेऊन गणेशोत्सव काळात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. व्यापारी वर्गाच्या मागणीचा सकारात्मक विचार करत पोलिस प्रशासनाने रात्री १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली.
यावेळी भाजपा नेते धनंजय जाधव, प्रसाद मोरे, प्रेम चिखलकर यांच्यासह केळकर बाग परिसरातील तसेच शहरातील अनेक व्यापारी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसह व्यापाऱ्यांनाही या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

