धक्कादायक : एकाच कुटुंबातील चौघांची हत्या; मध्यरात्री झोपेत असताना मारेकऱ्यांचे कृत्य
घरात झोपी गेलेल्या एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गदग शहरात आज (शुक्रवार) पहाटे उघडकीस आली आहे. या हत्याकांडामुळे गदग जिल्हा हादरून गेला आहे. कार्तिक बाकळे (वय २७), परशुराम हादीमणी (वय ५५), लक्ष्मी हादीमनी (वय ४५) आणि आकांक्षा अशी खून झालेल्या चौघांची नावे आहेत. हे सर्व नातेवाईक गदग शहरातील प्रकाश बाकळे यांच्या घरच्या खालच्या मजल्यावर झोपले होते.
या विषयी अधिक माहिती अशी की, १७ एप्रिल रोजी कार्तिक बाकळेचा विवाह झाला होता. मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात मारेकर्यांनी घरात प्रवेश करून झोपलेल्या ठिकाणीच चौघांची हत्या करून पलायन केले. पहाटेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रकाश बाकळे यांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली.
लागलीच गदगचे जिल्हा पोलीस प्रमुख बी.एस. न्यामगौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह श्वान पथक आणि ठसेतज्ञांना देखील पाचारण करण्यात आले. एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याने गदग जिल्हा हादरून गेला आहे.