दोषी पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून चालकाला न्याय ददेण्याची मागणी
बेळगाव जिल्ह्यातील सौन्दती तालुक्यातील जोगुळबावी परिसरात पोलिसांकडून खाजगी वाहनचालकावर झालेल्या मारहाणीमुळे एकच खळबळ उडाली आहे.या घटनेचा कर्नाटक ड्रायव्हर्स युनियनने तीव्र निषेध व्यक्त केला असून, दोषी पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून चालकाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
२२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास खाजगी चालक शिवानंद अर्जुन कांबळे हे आपल्या कारसह जोगुळ बावी परिसरात थांबले असताना, सौन्दती तालुका पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी “नो पार्किंग”च्या कारणावरून त्यांना अडवले.
मात्र, त्या ठिकाणी कोणताही नो पार्किंगचा फलक नसल्याचा आरोप चालकाकडून करण्यात आला आहे. याबाबत विचारणा केल्यावर पोलिसांनी शिवानंद कांबळे यांना अश्लील शब्दांत शिवीगाळ करत कपडे ओढून मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेत चालकाला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.
या घटनेचा कर्नाटक ड्रायव्हर्स युनियनने तीव्र निषेध व्यक्त केला असून, दोषी पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून चालकाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही, तर संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. जी. नारायणस्वामी आणि जिल्हाध्यक्ष अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो चालक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
या घटनेवर वरिष्ठ प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

