Share News

सिटीज 2.0 योजनेतील निधी कपातीविरोधात पालिकेला विविध संघटनांचा घेराव

बेळगाव :
शहराच्या महत्त्वाकांक्षी सिटीज 2.0 योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीत मोठी कपात केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेला घेराव घालत आयुक्तांना निवेदन सादर केले.

शहराच्या विकासासाठी महत्त्वाची मानली गेलेली सिटीज 2.0 योजना सुरुवातीला सुमारे १३५ कोटी रुपयांच्या खर्चाची प्रस्तावित होती. मात्र हा निधी कमी करून ७५ कोटी रुपयांवर आणल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या योजनेअंतर्गत शहरातील मूलभूत सुविधा मजबूत करणे, हवामान बदलाला तोंड देण्यासाठी स्थैर्य उपाययोजना राबविणे तसेच आधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली उभारणे अशी उद्दिष्टे होती. परंतु निधीत जवळपास ६० कोटी रुपयांची कपात झाल्यामुळे अनेक महत्त्वाच्या कामांवर गंडांतर येण्याची शक्यता असल्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

७५ कोटी रुपयांमध्ये योजना राबविल्यास पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आवाका कमी होईल, कचरा व्यवस्थापनाची परिणामकारकता घटेल तसेच हवामान स्थैर्याशी संबंधित उपाययोजना मर्यादित होतील, असा आरोप करण्यात आला. यामुळे स्थानिक रोजगारनिर्मिती तसेच लघु व मध्यम उद्योगांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही कार्यकर्त्यांनी नमूद केले.

योजनेतील निधी कपातीबाबत पारदर्शकता ठेवावी आणि कपातीची कारणे सरकारने स्पष्ट करावीत, अशी मागणी नागरिक आणि विविध संघटनांकडून करण्यात आली आहे.

यावेळी राजकुमार टोपण्णवर, सुजीत मुळगंद, आयेशा सनदी, सतीश पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Share News