Share News

बेकायदा घडामोडी रोखा, अन्यथा कारवाई

डीजीपी अलोककुमार यांची सक्त ताकीद :

हिंडलगा कारागृहाची झाडाझडती

कैद्यांना शिक्षा म्हणून कारागृहात आणले जाते. त्यांचे लांगूलचालन मोबाईल, विडी, सिगारेट, अंमली पदार्थ देण्याचे प्रकार बंद करा. असे काही आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य कारागृह विभागाचे डीजीपी अलोकुमार यांनी हिंडलगा कारागृह प्रशासनाला दिला.राज्यातील कारागृहांचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच बेळगावला आले होते. बंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहानंतर बेळगावच्या हिंडलगा कारागृहात कुख्यात कैदी वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांनी कारागृहात जाऊन प्रत्येक कानाकोपऱ्याची झाडाझाडती घेतली. परंतु, त्यांचा आधीच धसका घेतलेल्या प्रशासनाने कारागृह आधीच क्लीन केले असल्याने काहीही मिळू शकले नाही.
पत्रकारांशी बोलताना अलोककुमार म्हणाले, हिंडलगा कारागृहात अनेक कुख्यात कैदी आहेत. त्यामुळे या कारागृहाला राज्यात महत्व आहे. या कारागृहाचे बांधकाम फारच जुने असल्याने येथे अनेक समस्या आहेत. त्याचे निराकरण करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी कारागृहात मोबाईल, सीमकार्ड, चार्जर, गांजा अशा आक्षेपार्ह वस्तू सापडत होत्या. परंतु, प्रशासनाला सक्त ताकीद दिल्याने आता बरीच सुधारणा झाली आहे. परंतु, आणखी बऱ्याच सुधारणा होणे आवश्यक आहे.
हिंडलगा कारागृहात जॅमर बसवलेला असतानाही आत मोबाईलची रेंज येते, हे चुकीचे आहे. हे
कैद्यांसाठी अनुकूल असून हे नेटवर्क बंद करण्याची सक्त सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. येथील बेकायदेशीर घडामोडी बंद व्हायलाच हव्यात. यासाठी कोणी अधिकारी अथवा पोलिस कर्मचाऱ्याची साथ आहे, हे समजल्यास तातडीने कारवाई केली जाईल, असा सज्जड दम त्यांनी भरला.
कारागृहाच्या प्रवेशद्वाराची पाहणी करून त्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना केली. कारागृहात कोणीही बाहेरील व्यक्ती अथवा वाहन आल्यास त्याची कडक तपासणी करूनच सोडावे, अशी सूचनाही त्यांनी केली.


Share News