सहायक पोलीस आयुक्त संतोष दयानंद सत्यनायक यांना २०२५ साठी मुख्यमंत्री पदकाने सन्मान
संतोष दयानंद सत्यनायक यांची ११.०१.१९९९ रोजी पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ०४.०५.२०२१ रोजी पोलीस निरीक्षक (PI) पदावरून उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) पदावर त्यांना पदोन्नती मिळाली. सध्या ते ०४.०९.२०२४ पासून मार्केट उपविभाग, बेळगाव शहर येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी पोलीस दलात सुमारे २७ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली आहे. आपल्या सेवाकाळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे रोखणे, आरोपींचा शोध घेणे तसेच गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना माननीय न्यायालयाकडून कठोर शिक्षा मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
बेळगाव शहर हे कन्नड आणि मराठी भाषिकांमधील वादांच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मानले जाते. तसेच श्री गणेशोत्सव व कर्नाटक राज्योत्सव हे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्यांनी प्रभावीपणे कायदा व सुव्यवस्था राखली आहे. याशिवाय रमजान, बकरीद तसेच बेळगाव हिवाळी अधिवेशनादरम्यानही त्यांनी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवून शांतता कायम राखली आहे.
मार्केट उपविभागांतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २२ मालमत्ता प्रकरणे उघडकीस आणण्यात आली असून, सुमारे ४७,९०,८८४ रुपये किमतीचे ७१५.७९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये त्यांनी प्रामाणिक व प्रभावी तपास करून यश मिळवले आहे.
पोलीस दलातील एक शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष व निष्ठावान अधिकारी म्हणून त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना वर्ष २०२५ साठी माननीय मुख्यमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

