Share News

खड्डेमुक्त बेळगाव उत्तरसाठी आमदार आसिफ सेठ यांचा पुढाकार; तक्रारी मिळताच खड्डे बुजविण्याचे काम सुरू

बेळगाव : ‘खड्डेमुक्त बेळगाव उत्तर’ या मोहिमेअंतर्गत आमदार आसिफ (राजू) सैत यांच्या पुढाकाराने मतदारसंघातील विविध भागांमध्ये रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या आधारे प्राधान्याने खड्डे दुरुस्त करण्यात येत आहेत.

या मोहिमेत नागरिक फोन, संदेश, खड्ड्यांचे फोटो तसेच अचूक ठिकाणाची माहिती टीमला पाठवत आहेत. त्यामुळे खराब झालेल्या रस्त्यांची माहिती मिळत असून, स्थानिक नगरसेवक आणि बेळगाव महानगरपालिकेच्या समन्वयाने दररोज विविध ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले जात आहे.

सध्या करण्यात येणारी खड्डे बुजविण्याची कामे तात्पुरत्या स्वरूपाची असून, नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा हा त्यामागील उद्देश आहे, असे आमदार सेठ यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी आवश्यक आहे, तेथे आगामी काही महिन्यांत कायमस्वरूपी डांबरीकरण व रस्त्यांचे संपूर्ण पुनर्बांधणीचे काम करण्यात येणार असून, नोव्हेंबरच्या सुमारास कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

“‘खड्डेमुक्त बेळगाव उत्तर’ ही एकदाच राबविण्याची मोहीम नाही. नागरिकांकडून मिळणारी प्रत्येक तक्रार आम्हाला कोणत्या भागात लक्ष देण्याची गरज आहे, हे समजण्यास मदत करते. आमची टीम दररोज नागरिकांनी कळविलेल्या खड्ड्यांवर काम करत राहणार असून, एका वेळी एका रस्त्याची दुरुस्ती करण्यावर भर दिला जात आहे,” असे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी सांगितले.

तात्पुरत्या दुरुस्तीबरोबरच रस्त्यांच्या समस्यांवर दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो आणि अचूक ठिकाणाची माहिती आमदारांच्या टीमकडे पाठवत राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेणे शक्य होऊन बेळगाव उत्तर मतदारसंघातील रस्ते अधिक सुरक्षित आणि खड्डेमुक्त करण्यास मदत होणार आहे.


Share News