गुणी विद्यार्थ्यांचा रोख पुरस्काराने सन्मान
-असिफ (राजू) सेठ फाउंडेशनचा उपक्रम
बेळगाव उत्तर मतदार संघातील सरकारी शाळांमधील एसएसएलसी परीक्षेत 95 टक्क्यांवर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना गौरवण्याचा उपक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने असिफ (राजू) सेठ फाउंडेशनतर्फे
सदर उपक्रमांतर्गत शहरातील कणबर्गी सरकारी हायस्कूलमधील तीन विद्यार्थी आणि
वंटमुरी कॉलनी सरकारी हायस्कूलमधील एक विद्यार्थी अशा एकूण चार विद्यार्थ्यांना
एसएसएलसी परीक्षेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रत्येकी 25,000 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.
यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला, आमदार असिफ (राजू) सेठ यांनी कणबर्गी सरकारी शाळांना भेट दिली होती आणि एसएसएलसी परीक्षेत 95 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनकडून बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा केली होती. अलिकडच्या परीक्षेच्या निकालानंतर त्यांनी आपल्या घोषणेची वरील प्रमाणे रोख पुरस्कार देऊन पूर्तता केली. “अशा कामगिरीवरून हे सिद्ध होते की दृढनिश्चय आणि पाठिंब्याने कोणतीही पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. माझे फाउंडेशन सरकारी शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील” असे आमदार सेठ बक्षीस वितरणाप्रसंगी म्हणाले. गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्याच्या आमदारांच्या या प्रेरणादायी कृतीची शिक्षक आणि पालकवर्गात प्रशंसा होत आहे.

