Share News

चलवेनहट्टी गावच्या प्रवेशद्वाराजवळ करणीबाधेचा प्रकार उघडकीस

बेळगाव तालुक्यातील चलवेनहट्टी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ करणीबाधेसारखा उतारा टाकल्याचा प्रकार समोर आला. गावाच्या प्रवेशद्वारात अज्ञात व्यक्तींनी लिंबू, मिरच्या व इतर काही वस्तू ठेवून उतारा टाकल्याचे आढळून आल्याने काही काळ गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच समाजप्रेमी मनोहर हुंदरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रवेशद्वाराजवळ ठेवलेला उतारा हटवून त्याचा बीमोड केला. तसेच अशा प्रकारांना घाबरून अंधश्रद्धेला बळी पडू नये, असे आवाहन करत त्यांनी गावकऱ्यांमध्ये समाजजागृती केली.काही ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार घडत असल्याची खंत व्यक्त करत मनोहर हुंदरे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. समाजाने अशा प्रकारांना भीक न घालता धैर्याने त्याला विरोध करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मनोहर हुंदरे यांच्या या धाडसी कृतीमुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण दूर झाले असून अंधश्रद्धेविरोधात समाजात सकारात्मक संदेश गेल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.


Share News