Share News

दुष्काळी परिस्थितीचा आढावा; मंत्री सतीश जारकीहोळींकडून पीकहानीची पाहणी

बेळगाव : जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी (१६ ऑगस्ट) यरगट्टी आणि रामदुर्ग तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन दुष्काळी परिस्थिती तसेच पीकहानीची पाहणी केली.

यरगट्टी तालुक्यातील कुरबगट्टी गावात मंत्री जारकीहोळी यांनी शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन पावसाअभावी नुकसान झालेल्या विविध पिकांची पाहणी केली. रेवप्पा चिक्कण्णवर यांच्या शेतातील मूग, शांतव्वा चिक्कोडी यांच्या शेतातील भुईमूग तसेच गंगाधर उल्लिगड्डी यांच्या शेतातील वाळलेल्या मक्याच्या पिकाची त्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांकडून माहिती घेतली.

यानंतर होन्नप्पा पूजेरी आणि चन्नप्पा उल्लिगड्डी यांच्या शेतातील मक्याच्या पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. पावसाचे प्रमाण, पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

रामदुर्ग तालुक्यातील इटनाळ गावात शंकरप्पा कोप्पद यांच्या शेतातील नुकसान झालेल्या उडदाच्या पिकाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर हुलकुंद येथे इंद्रकुमार पाटील यांच्या शेतातील कापूस आणि लालसाब नदाफ यांच्या शेतातील मूग पिकाच्या नुकसानीची माहिती घेतली.

चिप्पळकट्टी गावात सुरेश कौजलगी यांच्या शेतातील मूग, तूर आणि कांदा पिकांची, तर प्रमोद सिंगारू यांच्या शेतातील कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. बीजगुप्पी येथे पुंडलिक भजंत्री व दुंडप्पा पाटील यांच्या शेतातील कापूस, तसेच अडिवेप्पा पाटील आणि वीरुपाक्षी यांच्या शेतातील कांदा पिकाच्या नुकसानीची माहिती घेण्यात आली.

कदामपूर येथे बसवराज हाळ्ळोळी यांच्या शेतातील मूग, तर गुरुसिद्धप्पा नरगुंद आणि ईरन्नगौड पाटील यांच्या शेतातील कांदा पिकाच्या नुकसानीची मंत्री जारकीहोळी यांनी पाहणी केली.

पीकहानीची वस्तुस्थिती नोंदवण्याचे निर्देश

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, पीकहानीचे प्रमाण आणि शासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत मंत्री जारकीहोळी यांनी शेतकरी व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पीकहानीची वस्तुस्थिती योग्य पद्धतीने नोंदवून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी सरकारचे मुख्य सचेतक अशोक पट्टण, सवदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील हनुमण्णवर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक रामराजन के., कृषी विभागाचे संयुक्त संचालक एच. डी. कोळेकर, यरगट्टी तहसीलदार एम. व्ही. गुंडप्पगोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी व स्थानिक नेते उपस्थित होते.


Share News