राष्ट्रीय स्पीड रोलर स्केटिंग स्पर्धेत कुलदीप बिर्जेची चमकदार कामगिरी
1000 मीटर रिंक रेसमध्ये सुवर्ण, तर 2000 मीटर रोड रेसमध्ये रौप्यपदक
बेळगाव : केंद्रीय विद्यालय संघटनेच्या ५५व्या राष्ट्रीय पातळीवरील स्पीड रोलर स्केटिंग स्पर्धेत केंद्रीय विद्यालय क्रमांक-२, बेळगावचा विद्यार्थी कुमार कुलदीप लक्ष्मण बिर्जे याने उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
चेन्नई आणि पुदुचेरी येथे ७ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कुलदीपने १००० मीटर रिंक रेसमध्ये सुवर्णपदक, तर २००० मीटर रोड रेसमध्ये रौप्यपदक पटकावले.
कुलदीपच्या या यशामागे त्याची मेहनत, जिद्द आणि चिकाटीसोबतच त्याच्या कुटुंबाची साथ आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. स्केटिंगची आवड निर्माण करून त्याला योग्य प्रशिक्षण देणारे गुरु श्री. सूर्यकांत हिंडलगेकर, श्री. विठ्ठल सर, कुमार सोहम हिंडलगेकर आणि श्री. योगेश कुलकर्णी यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
तसेच केंद्रीय विद्यालय क्रमांक-२, बेळगावचे प्राचार्य श्री. महेंद्र कालरा, क्रीडाशिक्षक श्री. अविनाश कुमार सिंग, श्री. मोहन गावडे आणि सौ. पूजा मुचंडी यांचेही कुलदीपला सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
कुलदीप हा जिद्दी आणि चिकाटीचा खेळाडू असून, स्पर्धेत उतरताना विजय मिळवण्याच्या आत्मविश्वासाने तो मैदानात उतरतो. त्याच्या मेहनतीचे आणि आत्मविश्वासाचे रूपांतर त्याने या राष्ट्रीय स्पर्धेतील दोन पदकांच्या रूपाने करून दाखवले आहे.
कुलदीपच्या या यशामुळे केंद्रीय विद्यालय क्रमांक-२, बेळगावचे नाव राष्ट्रीय स्तरावर अभिमानाने उंचावले आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत असून, भविष्यातील क्रीडा वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

