Share News

जिवंतपणीच ‘तीने’ घेतला तिरडीचा आधार

आजारी महिलेला खांद्यावर घेऊन धो धो पावसात कापले 5 कि. मी. अंतर

असुविधांमुळे आमगाव ग्रामस्थांचे दुखणे आजही कायम

आजारी महिलेला तिरडीवरून नेताना ग्रामस्थ.

बेळगाव जिल्हयातील खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील जनतेला पावसाळ्यात अक्षरशः मरण यातनांचा सामना करावा लागतो. याचाच आणखी एक प्रत्यय आमगावकरांनी अनुभवला. गावातील एक महिला तापाने फणफणत असताना अचानक बेशुद्ध झाली. तिला तातडीने दवाखान्यात नेणे आवश्यक होते. पण रस्ता व पूल नसल्याने गावापर्यंत रुग्णवाहिका पोहोचणेच अशक्य होते. अशा परिस्थितीत जिवंत महिलेला चक्क तिरडीवरून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याचे अग्निदिव्य पार पाडावे लागले. त्यासाठी धो धो पावसात तब्बल पाच किलोमीटर अंतर खांद्यावरुन महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत पोहचवून दवाखान्यात दाखल केल्याने तिचा जीव वाचला.
गावातील हर्षदा हरिश्चंद्र घाडी (36) थंडी तापाने आजारी झाल्या. त्यांची तब्येत नाजूक वाटू लागल्याने तातडीने दवाखान्यात हलविणे अनिवार्य बनले. पण गावापर्यंत रुग्णवाहिका येऊन पोहोचण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांनी संततधार पावसातून वाट तुडवत तिरडीवरून महिलेला रुग्णवाहिका येणार होती तिथपर्यंत नेले. नेटवर्कमध्ये पोचल्यानंतर जांबोटी येथील रुग्णवाहिकेशी संपर्क साधून बोलावून घेण्यात आले. तेथून बेळगाव सिव्हिल इस्पितळात दाखल करण्यात आल्याने तिचा जीव वाचला.


Share News